पंडू

पंडू हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा व पांडवांचा पिता होता. तो हस्तिनापुराचा राजा असलेल्या विचित्रवीर्याच्या दुसर्‍या पत्नीस, म्हणजे अंबालिकेस व्यास पाराशरापासून झालेला पुत्र होता. व्यासाला पाहून अंबालिका भयाने पांढरी पडली, म्हणून हा कांतीने पांढरा (पंडुरोगी) होता, अशी आख्यायिका सांगितली जाते. कुंतीमाद्री या त्याच्या दोन पत्नी होत्या. त्यांच्यापासून झालेले याचे पाच पुत्र पांडव म्हणून ओळखले जात.


पंडूला धृतराष्ट्र नावाचा थोरला भाऊ होता. धृतराष्ट्राहून वयाने लहान असूनही, धृतराष्ट्र आंधळा असल्याने पंडू हस्तिनापुराचा कारभार पहात होता.

एकदा पंडूने शिकार करताना चुकून किंदम ऋषी पति-पत्नीस हरणांची जोडी समजून बाण मारला. मरण्यापूर्वी किंदम ऋषींनी पंडूला शाप दिला की जेव्हा तो एखाद्या स्त्रीजवळ शरीरसुखाच्या अपेक्षेने जाईल, तेव्हा त्याला तत्काळ मृत्यू येईल. यानंतर विफल होऊन, राज्यत्याग करून पंडू आपल्या दोन्ही पत्नींसह वनवासात राहू लागला. पुत्रप्राप्तीचा मार्ग खुंटल्याने पंडूने कुंतीला व माद्रीला नियोग पद्धतीने पुत्रप्राप्ती करून घेण्यास सांगितले. तेव्हा कुंतीने तिच्याकडे असलेल्या मंत्राच्या सामर्थ्याबद्दल पंडूला माहिती दिली. पंडूने त्या मंत्राद्वारे पुत्रप्राप्ती करून घेण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर कुंतीने यमापासून युधिष्ठिर, वायूपासून भीम आणि इंद्रापासून अर्जुन असे तीन पुत्र प्राप्त करून घेतले. आपली सवत माद्री हिलादेखील माता होण्याचा अधिकार मिळावा म्हणून कुंतीने आपला मंत्र तिला दिला.. नंतर माद्रीने त्या मंत्रसामर्थ्याने अश्विनीकुमारांपासून नकुल आणि सहदेव हे जुळे पुत्र प्राप्त करून घेतले.. पंडू राजाच्या या पाच पुत्रांनाच पांडव असे म्हणतात. कुंती माद्रीच्या मुलांनाही आपल्या पोटच्या मुलांप्रमाणेच वागणूक देत असे.

पुढे शापाचा विसर पडून पंडू माद्रीसोबत प्रणय करू पहात असताना, त्याचा किंदम ऋषींच्या शापाच्या प्रभावाने मृत्यू झाला, व त्याचे प्रायाश्चित म्हणून माद्री त्याच्याबरोबर सती गेली.

This article is issued from Wikipedia. The text is licensed under Creative Commons - Attribution - Sharealike. Additional terms may apply for the media files.